महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पश्चिम घाटावर 'प्रकाशमान' होणारी बुरशी, पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणी - Shining fungus in Tilari

आपण बुरशीचे अनेक प्रकार पाहिले असतील. पण आपण कधीही चमकणारी बुरशी ऐकली किंवा पाहिली आहे का? हो, हे खरं आहे की, बुरशी देखील प्रकाशमान होते. त्याला बायो-ल्युमिनेसेंट बुरशी म्हणतात. ही प्रकाश देणारी दुर्मीळ बुरशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिलारीच्या जंगलात दिसली आहे. ही बुरशी रात्रीच्या अंधारातही हिरव्या गडद रंगात चमकते.

Rare light fungi
'प्रकाशमान' होणारी बुरशी

By

Published : Nov 10, 2020, 1:57 PM IST

Updated : Nov 10, 2020, 2:42 PM IST

सिंधुदुर्ग- प्रकाशमय बुरशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग परिसरातील तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राच्या परिसरात पहिल्यांदाच आढळली आहे. पश्चिम घाटावरदिवसा ही बुरशी सामान्य बुरशीप्रमाणे दिसते. परंतु रात्रीच्या वेळी त्यातून प्रकाश बाहेर पडतो. विशेष म्हणजे, या चमकणाऱ्या बुरशीचे व्हिडीओ चित्रीकरण करणे अशक्य आहे, असे उपस्थित तज्ज्ञांनी सांगितले. अथक परिश्रमातून कॅमेऱ्यात ही बुरशी फोटोच्या माध्यमातून कैद करता आली आहे.

सिंधुदुर्गात तिलारीच्या राखीव वन क्षेत्रात चमकणारी बुरशी

वन्यजीव अभ्यासक संजय सावंत यांच्या मते ही बुरशी रात्री प्रकाशमान होते. त्यातून प्रकाशाचे उत्सर्जन करते. ही प्रकाशमान होणारी बुरशी झाडाची साल, जुन्या सडलेल्या झाडांच्या खोडावर, जंगलातील वनस्पतीच्या पानांवर ज्या ठिकाणी ओलावा असतो, अशा ठिकाणी प्रकाशमान होते. ही बुरशी एक विशेष प्रकारची (फंगी) आहे. या बुरशीची जंगलात वाढ होण्यासाठी पुरेसा ओलावा लागतो. ही प्रकाशमान होणारी बुरशी सहसा दिसत नाही. त्यांना शोधाणे फार कठीण असते त्यासाठी रात्री जंगलात फिरायला लागतं, असं ते म्हणाले.

पर्यावरण तज्ज्ञ संजय नाटेकर सांगतात, जगभरात अंधारात प्रकाशित होणाऱ्या बुरशीच्या साधारण ७१ प्रजाती सापडतात. यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या केवळ पावसाळ्यातच प्रकाशमान झालेल्या आढळतात. त्यांचा अधिवास हा प्रामुख्याने मृत झाडांच्या खोडांवर असतो. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवरील पश्चिम घाटातील जंगलांमध्ये त्यांच्या नोंदी आहेत. चकाकणारी बुरशी साधारण ५२० ते ५३० एनएम तरंगलांबीचा हिरवा रंगाचा प्रकाश निर्माण करते. हे प्रकाश उत्सर्जन सतत चालू राहते आणि केवळ सजीव पेशींमधूनच त्याचे उत्सर्जन होते. प्रकाश उत्सर्जित करणारे अवयव (वनस्पतीचे भाग) हे प्रजातीनुरूप वेगवेगळे असतात, असे ते म्हणाले.

तर येथील स्थानिक नागरिक देवेंद्र शेटकर यांच्या मते, ही बुरशी येथील पर्यटनात मोठा वाटा उचलणारी ठरेल. यासाठी शासनाने हा महत्त्वाचा दुवा संरक्षित करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे, असे ते म्हणाले.

या जंगलात अळंबी वर्गीय फंगसही आढळला आहे. रात्रीच्या वेळी या फंगसवर बॅटरीचा उजेड टाकला की, त्यातून धूर बाहेर येत असल्याचे दिसते. निसर्गातील अद्भुत जीवनचक्राचा अनुभव चक्रावून सोडतो.

तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी भागातील वन्यजीव अभ्यासक संजय सावंत, अमित सुतार, तुषार देसाई, संजय नाटेकर, देवेंद्र शेटकर, राजन कविटकर, विकास देसाई, विनायक देसाई रात्रीच्या वेळी जंगलात फिरत असतात. तिथे तिलारीच्या घनदाट जंगलात ही बुरशी दिसली. हे वन्यजीव अभ्यासक रात्री फिरण्यासाठी तिलारीच्या जंगलात गेले असता त्यांच्याजवळील लाइट बंद करून उभे राहिले. काही वेळाने जंगलात काहीतरी प्रकाशमान होत आहे, हे समजल्यावर त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या मोबाइलमध्ये फोटो, व्हिडीओ टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाइलमध्ये फोटो, व्हिडीओ आले नाहीत. जेव्हा त्यांनी ही चमकणारी बुरशी पहिल्यांदा पाहिली त्यावेळी ते स्तब्ध झाले. पश्चिम घाटात खास करून महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रकाशित होणाऱ्या बुरशीच्या प्रजातींवर अभ्यास झालेला नाही. त्यामुळे हा अभ्यास हाती घेऊन या दुर्मीळ प्रजातींच्या नोंदी होणे आवश्यक आहे.

Last Updated : Nov 10, 2020, 2:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details