सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या डिंगणे-बांबरवाडी आणि इन्सुली गावकरवाडी येथे शनिवारी लागलेल्या आगीत सुमारे १० एकर क्षेत्रातील काजू, आंबा व फणस बागायती जळून खाक झाली आहे. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे १५ लाखाचे नुकसान झाले आहे. डिंगणे-बांबरवाडी येथील महेश बांदेकर, राजन बांदेकर आणि इन्सुली येथील कृष्णा मेस्त्री यांची ही बागायती आहे.
डिंगणे-बांबरवाडी येथे आज (शनिवारी) दुपारी शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे ४ एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत महेश बांदेकर, राजन बांदेकर यांच्या मालकीची काजू बाग जळाली. ऐन हंगामात काजू बाग जळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. बांदेकर यांच्या काजू बागायती लगतच उच्च दाबाची वीज वहिनी जाते. याठिकाणी आज भर दुपारी शॉर्टसर्किट होऊन आग लागली. दुपारची वेळ असल्याने व वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिकांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने काजू बागायतीला वेढल्याने संपूर्ण बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
इन्सुलीत १० लोकांचे नुकसान -
इन्सुली गावकरवाडी येथे शनिवारी दुपारी अज्ञाताकडून लावण्यात आलेल्या आगीत तीन एकर बागायती जळून खाक झाली. यात कृष्णा सखाराम मेस्त्री यांची २०० हुन अधिक काजू कलमे, ५० नारळाची झाडे, १० आंबा कलमे, फणसाची झाडे व पाइपलाइन असे एकूण सुमारे १० लाखाचे नुकसान झाले. भर दुपारी लागलेल्या आगीमुळे ५ ते ६ वर्षाची काजू कलमे जळून खाक झाली. इन्सुली गावकरवाडी येथील गाळव परिसरात कृष्णा मेस्त्री यांची सुमारे तीन एकरहून अधिक बागायत आहे. नेहमीप्रमाणे ते काजू गोळा करून दुपारी जेवणासाठी घरी गेले होते.दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास बागायतीमधून धूर दिसू लागला. ते बागायतीत गेले असता आग लागल्याचे दिसले त्यांनी याबाबतची माहिती शेजाऱ्यांना देताच त्यांनी मदत कार्यासाठी धाव घेतली. दुपारची वेळ व वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते त्यातच पाइपलाइन जळल्याने पंपपण चालू करणे शक्य झाले नाही. तरीही स्थानिकांनी कळशीतून पाणी आणून शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
आग वीजवण्याचे करण्यात आले प्रयत्न -
शेतकऱ्यांचे पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न अपुरे पडले. यामध्ये १० एकर क्षेत्रातील शेकडो काजूची कलमे, आंबा कामे आणि फणसाची झाडे आगीत जळून खाक झाली. ऐन काजू हंगामात बागायती जळाल्याने शेतकरी आर्थिक मेटाकुटीस आला आहे. आगीची कल्पना दिल्यानंतर डिंगणेत महावितरणचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी आग शॉर्टसर्किटने लागल्याने महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तर इंसुलीत आग कशामुळे लागली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.