सिंधुदुर्ग - जिल्ह्यात येण्यासाठी आणि जिल्ह्यातून अन्य भागात जाण्यासाठी अनेकांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात सध्या चाकरमान्यांचा ओघ सुरूच आहे. सिंधुदुर्गात येण्यासाठी 18 हजार 854 व्यक्ती इच्छुक आहेत. राज्याबाहेर जाण्यासाठी 17 हजार 130 व्यक्तींनी नावनोंदणी केली आहे, तर अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी 13 हजार 25 जणांची नोंदणी केली आहे.
जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढू लागली आहे. होम क्वारंटाईन आणि संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या व्यक्तींची संख्या 946 वर पोहोचली आहे. मात्र, सुदैवाने आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 26 रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी 13 हजार 25 जणांची नोंदणी
आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी 13 हजार 25 व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाच्या लिंकवर नोंद केली आहे. या सर्वांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्याबाबत त्या-त्या जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले आहे.