सिंधुदुर्ग- जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी २८.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. सततच्या पावसाने कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे.
सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी आदी तालुक्यात काल (शुक्रवार) सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. तर पुढील तीन दिवस तळकोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
समुद्रामध्ये पुढील 4 दिवस ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रामध्ये जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच वेगाने वारे वाहणार असल्यामुळे समुद्र खवळलेला राहील. त्या अनुषंगाने किनारपट्टीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आल्या आहेत.
27 गावांचा संपर्क तुटला
सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. परिणामी काल (शुक्रवार) सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान आंबेरी पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे पुन्हा एकदा येथील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. उशिरापर्यंत पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे अनेक वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकलेली होती. शाळकरी मुलांना देखील सुमारे दिड तास ताटकळत रहावे लागले. तसेच नागरिकांना देखील मनस्थाप सहन करावा लागला. अखेर पाणी ओसरल्यानंतर काही अंशी वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र, अजूनही निर्मला नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पुराचा धोका कायम आहे.