महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 20, 2020, 7:46 AM IST

Updated : May 20, 2020, 10:40 AM IST

ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट : कर्नाटकातील 250 खलाशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकले...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी 31 मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडूमधील लोकांना कर्नाटक राज्यात प्रवेश घेता येणार नाही, अशी माहिती दिली आहे. कर्नाटक शासनाच्या निर्णयामुळे सिंधुदुर्गमध्ये अडकून पडलेल्या खलाशांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.

कर्नाटकातील 250 खलाशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकून
कर्नाटकातील 250 खलाशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकून

सिंधुदुर्ग - कर्नाटक राज्याने चार राज्यांतील मजुरांना आपल्या राज्यात प्रवेश देण्यासाठी 31 मेपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारी बोटींवर कार्यरत असणारे तब्बल 250 हुन अधिक खलाशी अडकून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रमिक रेल्वे चालवून शासनाने कर्नाटकातील विजापूर आणि इतर ठिकाणच्या मजुरांना आपल्या घरी पाठविले. मात्र, कारवार येथील मजुरांसाठी अद्याप अशी रेल्वे निश्चित केली नसून आता कर्नाटक शासनाच्या निर्णयामुळे घरवापसीसाठी डोळे लावून बसलेल्या खलाशांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.

कर्नाटकातील 250 खलाशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकले

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडीयुरप्पा यांनी 31 मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडूमधील लोकांना कर्नाटक राज्यात प्रवेश घेता येणार नाही, अशी माहिती दिली आहे. याबाबतचे वृत्त प्रसार माध्यमांकडून खलाशांना समजल्यानंतर त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन वेबसाईटवर या मजुरांनी घरवापसीसाठी आपली नोंदणी केली होती. मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनीही यासाठी प्रयत्न चालविले होते. मात्र, लॉकडाऊन वाढविण्यात आल्यानंतर कर्नाटक शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फटका मासेमारी बोटींवरील खलाशांना बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेली दोन दिवस सुटलेल्या वाऱ्यांमुळे मासेमारी नौका किनाऱ्यावरच उभ्या आहेत. 30 मेपर्यंत मासेमारी हंगाम असला, तरी आतापासूनच मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एक आठवडा अगोदरच मासेमारी हंगाम संपल्याची चिन्हे आहेत. मासेमारी हंगाम संपल्यानंतर कार्यरत असलेले खलाशी आपल्या गावी जातात. आता 31 मेपर्यंत कर्नाटक शासनाच्या निर्णयामुळे हे खलाशी मालवणसह जिल्ह्यातील इतर किनारपट्टीवर अडकून पडणार आहेत. याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देऊन या खलाशी वर्गाच्या घरवापसीसाठी आतापासूनच पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

कारवारमधील खलाशांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितलेल्या परवानगीमध्ये आपण स्वखर्चाने घरवापसी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. सर्व खलाशांच्या मालकांनी यासाठी गाड्यांचीही व्यवस्था केलेली आहे. जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घातल्यास महाराष्ट्रातून गोवा बॉर्डर येथून कर्नाटकची कारवार बॉर्डर सुरू होते. या खलाशांनी गोवा बॉर्डरपर्यंत सोडण्याची व्यवस्था राज्य शासनाने करावी, अशी मागणी खलाशी वर्गातून होत आहे.

Last Updated : May 20, 2020, 10:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details