सिंधुदुर्ग- आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला सुट्टी देण्यात आली आहे. हा रुग्ण मुंबईतून जिल्ह्यात आला होता. रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुट्टी मिळाल्यानंतर रुग्णाने डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत; रुग्णालयाने दिली सुट्टी - sindhudurg
१४ दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यास आज सुट्टी देण्यात आली आहे.
२६ मार्च रोजी रुग्णात कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर रुग्णास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या रुग्णावर उपचार सुरू केले. त्यानंतर १४ दिवसांनी त्याचा स्वॅब नमुना घेऊन कोरोना तपासणी करण्यात आली. या वेळी रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर २४ तासाच्या आंतराने घेतलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यावर रुग्णास आज सुट्टी देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, संजय पडते आदींसह रुग्णालयातील कोविड-१९ वॉर्डमधील कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा-कोरोनामुळे मृत्यू झाला तर आनंदच होईल, मच्छीमारांची भावना