सिंधुदुर्ग- सीमा भागातील गोव्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गोवा शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सिंधुदुर्गातील पाच परीक्षा केंद्रावर शनिवारपासून सुरू झाली. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा शासनाच्या नियामांचे पालन करत घेण्यात येत आहे. सावंतवाडी तालुक्यात सातार्डा, आरोंदा केंद्रावर तर दोडामार्ग तालुक्यात भेडशी, आयी व चोर्ला केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे. या केंद्रावर एकूण 197 विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती गोवा शिक्षण मंडळाचे सचिव भगिरथ शेटये यांनी दिली.
सॅनिटाईज प्रश्नपत्रिका, सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच वर्गात मास्क लावून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. सातार्डा केंद्रावर 71, आरोंदा 17, भेडशी 61, आयी 24 व चोर्ला केंद्रावर 24 असे एकूण 197 सिंधुदुर्गचे विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन परीक्षा घेण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची शारीरिक तपासणी करुनच परीक्षागृहात प्रवेश देण्यात येत आहे. शिवाय सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी, पोलीस व स्वयंसेवक यांची टीम कार्यरत आहे.