सिंधुदुर्ग -जिल्ह्यात 15 जानेवारीला होणाऱ्या 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 602 जागांसाठी तब्बल 1 हजार 558 अर्ज दाखल झाले आहेत. प्रामुख्याने जिल्ह्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असेच या निवडणुकीचे चित्र आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील सर्वाधिक दबदबा शिवसेनेचा असल्याचे दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख ही 4 जानेवारी असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील 'या' 70 ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका
मालवण तालुक्यातील कुणकवळे, गोळवण-कुमामे, आडवली-मालडी, खरारे-पेंडूर, मसदे-चुनवरे. देवगड तालुक्यातील धालवली, गढीताम्हाणे, इळये, कातवण, कोर्ले, कुणकेश्वर, लिंगडाळ, मिठबाव, मोंड, मोंडपार, मुणगेई, मुटाट, नाडण, पाळेकरवाडी, पाटथर, पुरळ, रहाटेश्वर, शिरगाव, तळवडे, तांबळडेग, टेंबवली, वाडा, वरेरी, कणकवली तालुक्यातील भिरवंडे, गांधीनगर, तोडवली- बावशी, सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा, आरोस, आंबोली, इन्सुली, डिंगणे, तळवडे, चौकुळ, मळगाव, मळेवाड, कोलगाव, दांडेली. वैभववाडी तालुक्यातील सोनाळी, लोरे नं 2, मांगवली, कोकिसरे, खांबाळे, एडगाव, वेंगसर, सांगूळवाडी, आचिर्ने, नाधवडे, भुईबावडा, कुभंवडे, ऐनारी आणि दोडामार्ग तालुक्यातील तेरवण-मेढे, आयनोडे-हेवाळे, कुडासे या ग्रामपंचायतीचा समावेश होता. कुडाळ तालुक्यातील वसोली, गिरगाव-कुसगाव, माड्याचीवाडी, वाडोस, कुपवडे, गोठोस, आकेरी, पोखरण-कुसबे, गोवेरी वेंगुर्ले तालुक्यांतील आरवली आणि सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून, प्रचार शिगेला पोहोचला आहे.
देवगडमधून सर्वाधिक अर्ज
सर्वाधिक 23 ग्रामपंचायती देवगड तालुक्यात आहेत. तालुक्यात सर्वाधिक 405 अर्ज दाखल झाले आहेत. सावंतवाडी तालुक्यात 11 ग्रामपंचायतींसाठी 378, वैभववाडी तालुक्यात 13 ग्रामपंचायतींसाठी 236, मालवण 6 ग्रामपंचायतींसाठी 192, कुडाळ 9 ग्रामपंचायतींसाठी 216, कणकवली 3 ग्रामपंचायतींसाठी 50, वेंगुर्ले दोन ग्रामपंचायतींसाठी 55, तर दोडामार्गमधील 3 ग्रामपंचायतींसाठी 26 अर्ज दाखल झाले आहेत.