सिंधुदुर्ग -जिल्ह्यातील 1 लाख 13 हजार 23 वीज ग्राहकांकडे आतापर्यंत वीजबिलापोटी तब्बल 71.30 कोटी रुपये एवढी प्रचंड थकबाकी आहे. मार्च 2020मध्ये हीच थकबाकी 24 कोटी रुपये होती. मात्र, कोरोना कालावधीत ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. 93 हजार 840 घरगुती वीज ग्राहकांकडे 29 कोटी 59 लाख 97 हजार रुपये एवढी मोठी थकबाकी आहे.
केव्हाही होऊ शकतो वीजपुरवठा खंडित
दरम्यान, उच्चदाब ग्राहक व 20 केव्ही जास्त लोड असलेल्या ग्राहकांना वीज वितरणने बिले भरण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून केव्हाही येऊ शकतात, असे वीज वितरणचे सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी सांगितले. ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, उच्चदाब वीज ग्राहकांना बिले भरण्याबाबत नोटिसा पाठविल्या आहेत. घरगुती ग्राहकांना वीजबिल भरण्याबाबत त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आवाहन केले आहे. घरगुती ग्राहकांकडे मोठी थकबाकी कणकवली विभागातील 47 हजार 774 घरगुती ग्राहकांकडे 14 कोटी 3 लाख 8 हजार रुपये, तर कुडाळ विभागात 46 हजार 66 ग्राहकांकडे 15 कोटी 56 लाख 89 हजार रुपये एवढी मोठी थकबाकी आहे. घरगुती ग्राहक कोरोना काळात वीजबिल थकल्याने व आता ती रक्कम मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते एकदम ती भरू शकत नाहीत. अशातच वीजबिल माफी मिळेल म्हणून काही ग्राहक वीजबिल भरत नाहीत. त्यामुळे वर्षभरात तिप्पट थकबाकी वाढली आहे.
वाणिज्य ग्राहकांकडे पावणे तेरा कोटींची थकबाकी
कणकवली विभागातील 4843 वाणिज्य ग्राहकांकडे 6 कोटी 58 लाख 15 हजार, तर कुडाळ विभागात 5039 ग्राहकांकडे 6 कोटी 28 लाख 99 हजार मिळून 10 हजार 782 ग्राहकांकडे 12 कोटी 87 लाख 14 हजार रुपये एवढी थकबाकी आहे.
औद्योगिक ग्राहकांची 10 कोटींची थकबाकी
कणकवली विभागात 967 औद्योगिक ग्राहकांकडे 5 कोटी 69 लाख 97 हजार, तर कुडाळ विभागात 1193 ग्राहकांकडे 4 कोटी 38 लाख 57 हजार रुपये मिळून 2160 ग्राहकांकडे 10 कोटी 8 लाख 54 हजार रुपये थकबाकी आहे.