सातारा - माण तालुक्यातील सर्व चारा छावण्यावरती जनावरांसोबत शेतकरी आपल्या कुटुंबासमवेत राहत आहेत. मात्र, आता दुष्काळामुळे त्यांच्या समोर जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरती उपाय म्हणून युवराज ढमालेंनी चारा छावण्यावरील शेतकऱ्यांसाठी रोज संध्याकाळच्या जेवणाची सोय केली आहे.
ढमाले ग्रुपचा उपक्रम, छावण्यांवरील शेतकऱ्यासाठी केली एक महिना जेवणाची सोय
माण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे. त्यामुळे उद्योजक, स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन शक्य होईल तेवढी मदत करावी, असे आवाहन युवराज ढमाले यांनी केले आहे.
राज्यात दुष्काळाचा फटका सर्वात जास्त शेतकरी वर्गाला बसत आहे. त्यामुळेच ढमाले ग्रुपकडून तालुक्यात असणाऱ्या १८ चारा छावण्यावरती शेतकऱ्यांना रोज संध्याकाळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. २० टन तांदूळ, १५ टन बाजरी, ५ टन तूरडाळ तसेच अनेक चारा छावण्या वरती प्रत्येकी १ किलो प्रमाणे १ महिना पेंड वितरित करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम गारळे, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, ढमाले कार्पोरेशनच्या संचालिका वैष्णवी ढमाले, बळवंत फाऊंडेशनचे संस्थापक बळवंत पाटील रासपच्या महिला अध्यक्षा वैशाली विरकर उपस्थित होते.
माणच्या दुष्काळाची माहिती मला माध्यमांद्वारे मिळाली. अशा वेळी सामाजिक बांधिलकी म्हणून तालुक्यात सुरू असलेल्या १८ छावण्यावरील शेतकऱ्यांना संध्याकाळी भाकरी, भात, डाळ भाजी मिळावी यासाठी १ महिन्याची मदत केली आहे. तसेच प्रत्येक छावणीत जनावरांना ९० पोती पेंड दिली आहे. याठिकाणी विविध संस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिक स्वरूपात तसेच वस्तू स्वरुपात मदत करावी. राज्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे. माण तालुक्या सारख्या ठिकाणी पशुधन वाचवणे हे मोठे काम आहे. शासन आपल्या परीने काम करत आहे. मात्र उद्योजक, स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन शक्य होईल तेवढी मदत करावी, असे आवाहनही ढमाले यांनी केले.