सातारा - वर्षभरापूर्वी हमदाबाज (ता. सातारा) येथे झालेल्या मीना आनंदराव देसाई (वय ५०) या महिलेच्या खुनाचे गूढ उकलण्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले आहे. गुन्हा करताना कोणताही पुरावा सोडला नसताना निव्वळ तर्क व बातमीदाराच्या माहितीच्या आधारावर संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
हेही वाचा -कराडात आढळले खवल्या मांजर; तस्करीचा संशय
सत्तार नन्नू शेख (वय 28 मूळ रा. लातूर सध्या रा. सुतारवाडी पुणे) याला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून हा खुनाचा प्रकार घडल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. शिवतेज हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकारांना या खून प्रकरणाची माहिती दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबर 2018 ला सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीना आनंदराव देसाई (वय 50) या महिलेचा मृतदेह हातपाय व तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानुसार सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आरोपीने कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. त्यामुळे पोलिसांना तपासाच्या कामात अनंत अडचणी येत होत्या.
हेही वाचा -शासकीय कामात अडथळा, नगरसेवक बाळू खंदारेंवर गुन्हा दाखल
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना देऊन वर्षभर तपास सुरू ठेवला. पोलिसांची गोपनीय गस्त व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी शिंदे यांच्या घराचे बांधकाम केलेली व्यक्ती साताऱ्यातून पुण्याला स्थलांतरित झाल्याची महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास करून सत्तार शेख याला पुण्यातून ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले.
पोलिसांच्या 'खास' चौकशीत शेख फार काळ टिकाव धरू शकला नाही. मीना शिंदे यांनी घराच्या बांधकामाचे पैसे न दिल्याच्या रागातून खुनाचे कृत्य केल्याची कबुली शेख याने दिली आहे. या प्रकरणात त्याचा आणखी एक साथीदार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तपासात हवालदार दादा परिहार, राजू मुलाणी, सुजीत भोसले, राजेश वंजारी, रमेश चव्हाण, संदीप कुंभार यांनी भाग घेतला.