महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातार्‍यातील डॉक्टर दाम्पत्याचा फलटणमधील युवकाला १५ लाखांचा गंडा - shahabaz shaikh

साताऱ्यातील चारभिंती परिसरात बांधकाम प्रकल्पामध्ये भागिदारी देतो, असे सांगून साताऱ्यातील डॉक्टर दाम्पत्यांनी फलटणमधील एका युवकाला तब्बल १५ लाखाला गंडविले.

डॉक्टर दाम्पत्य

By

Published : Jul 16, 2019, 4:59 PM IST

सातारा- येथील चारभिंती परिसरात बांधकाम प्रकल्पामध्ये भागिदारी देतो, असे सांगून फलटणमधील एका युवकाकडून भागिदारीपोटी तब्बल १५ लाख रुपये घेवून त्या युवकाला भागिदारीत न घेता परस्पर फ्लॅटची विक्री केली. याबाबत संबंधित युवकाने विचारणा केली असता त्याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र, संबंधित डॉक्टर दाम्पत्याला फलटण शहर पोलीस पाठीशी घालत असल्यामुळे ‘त्या’ युवकासह त्याचा परिवारही दहशतीच्या छायेखाली वावरत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील चारभिंती परिसरात डॉ. प्रशांत चंद्रकांत काळे व त्यांची पत्नी डॉ. अनुजा प्रशांत काळे यांचा बांधकाम प्रकल्प सुरु होता. यावेळी एका मध्यस्थीच्या मदतीने काळे दाम्पत्याने आम्हाला सातारा येथील बांधकाम प्रकल्पासाठी भागिदार हवा आहे, असे सांगितले होते. त्यानुसार फलटण येथील पंकज आटपाडकर याने त्यांचा मित्र सिद्धार्थ सुभाष काकडे (रा. मंगळवार पेठ, फलटण) याच्याशी संपर्क साधला. त्यानुसार सिद्धार्थ काकडे याने १३ डिसेंबर, २०१३ रोजी काळे दाम्पत्याबरोबर करारनामा केला. करारपत्रानुसार सिद्धार्थ काकडे याने काळे दाम्पत्याच्या बांधकाम प्रकल्पामध्ये १५ लाख रुपये गुंतवले होते.

करारपत्रानुसार ३३.३३ टक्के निव्वळ नफा व १५ महिन्यानंतर १५ लाख रुपये काकडे यांना परत देण्याचे ठरले होते. तसेच बांधकाम प्रकल्पातील फ्लॅटच्या विक्रीबाबतच्या सहीचा अधिकारदेखील काकडे यांना देण्याचे ठरले होते. करारपत्रानुसार काकडे यांनी २०१३-१४ मध्ये बांधकाम साहित्य व बँकेच्या माध्यमातून रोख रक्कम असे मिळून १५ लाख रुपये काळे दाम्पत्याला दिलेले होते. संबंधित रकमेची पावतीही काळे दाम्पत्याने काकडे यांना दिलेली होती. मात्र, पैसे मिळाल्यानंतर काही दिवसांतच करारपत्राचा भंग करुन काळे दांम्पत्याने बांधकाम प्रकल्पामधील अनेक फ्लॅटची परस्पर विक्री केल्याचे काकडे यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर काकडे यांनी काळे दाम्पत्यास जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत नोटबंदीचे कारण पुढे करुन तसेच रेरा नियमांतर्गत पैसे भरायचे आहेत, असे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्याचप्रमाणे कराराप्रमाणे भागिदारीतील निव्वळ नफाही काकडे यांना दिला नाही. ऑक्टोबर २०१८ मध्ये काकडे यांनी काळे दाम्पत्याच्या सातारा येथील घरी जावून रकमेची मागणी केली. यावेळी काळे दाम्पत्याने काकडे यांना अपमानास्पद वागणूक देवून ‘तुला बघून घेतो, तुला आम्ही पैसे परत देणार नाही’, असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तुझ्याच विरोधात छेडछाडीची तक्रार करु, अशी धमकी काळे दाम्पत्याने काकडे यांना दिली. याप्रकरणी दि. २८ जून, २०१९ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात काकडे यांनी अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) अंतर्गत, तसेच फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. मात्र, १९ दिवस उलटूनही फलटण शहर पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. उलट डॉ. काळे दाम्पत्यालाच फलटण शहर पोलीस अभय देत असल्याचा आरोप सिद्धार्थ काकडे यांनी केलेला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details