सातारा - जिल्ह्यात चार तालुके गंभीर स्वरूपाचा दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आले. जनावरांना चारा छावण्या पाणी टँकर शासनाने मंजूर करून चालू केले. मात्र, काही भागात आजही चारा छावण्या व टँकर मंजूर नसल्याने अनेक भागात नागरिकांची व शेतकऱ्यांची मोठी पायपीट चालू आहे. यातच दुष्काळी भागातील काही तरुणांनी मूठभर दाणे आणि ओंजळभर पाणी पक्ष्यांसाठी हे अभियान म्हसवड, शिंगणापूर, फलटण, खटाव, कोरेगाव सातारा, कास पठार या ठिकाणी राबविण्यास सुरवात केली आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या पक्षी, प्राण्यांसाठी हा युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर झटत आहे.
पाखरांसाठी मुठभर दाणे आणि ओंजळभर पाणी, तरुणांचे अभियान
साताऱ्याच्या दुष्काळी भागातील काही तरुणांनी मूठभर दाणे आणि ओंजळभर पाणी पक्ष्यांसाठी हे अभियान म्हसवड, शिंगणापूर, फलटण, खटाव, कोरेगाव सातारा, कास पठार या ठिकाणी राबविण्यास सुरवात केली आहे.
आज माणसाचे निसर्गाकडे कळत - नकळत होणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे दिवसेंदिवस कमी होणारे पावसाचे प्रमाण याचा मनुष्याबरोबरच मुक्या वन्यजीव प्राणी आणि पक्षांनाही त्रास होतोय. याची जाणीव आपल्या सर्वांनाच असणे गरजेचे आहे. पक्षी उडत असल्याने त्यांची पचनसंस्था उत्तम राहण्यासाठी त्यांच्या शरीराला मुबलक पाण्याची आवश्यकता असते. चांगले पाणी मिळत नसेल तर त्यांची पचनसंस्था व्यवस्थित राहत नाही. कोणत्याही ऋतूमध्ये विशेषतः उन्हाळ्यामध्ये ज्यांच्याकडे शेती आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये झाडाखाली पानथळी बनवावेत प्रत्येकाने आपल्या घरासमोर पक्षांसाठी मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवावे. त्यांच्यासाठी घरटी बसवावीत. खायला नैसर्गिक आणि खायला अन्न ठेवायला हवे, असे आव्हान "निसर्ग माझा सखा" या परिवाराने केला आहे. दुष्काळी भागात वनक्षेत्रातील झाडेसुद्धा नाहीशी झाल्यामुळे पक्षी सर्वत्र पोटासाठी भटकंती करत असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी पक्षी, अन्न व पाण्यावाचून तडफडून मरत आहेत. पक्ष्यांची होणारी हानी रोखण्यासाठी उत्तम साठे, तन्वीर तांबोळी, कृष्णा राऊत, कन्हैया पवार, सद्दाम मुलाणी, रवी शिंगटे, समीर लोखंडे, संग्राम साठे या तरुणांनी एकत्र येत पक्षांना पाणी व धान्य झाडावर बाटलीच्या साह्याने ठेवण्याचे काम सुरू केले आहे. या माध्यमातून हे कार्य पक्षांसाठी अभियानाची सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी सोबत पक्षांना टाकण्यासाठी खाद्य तसेच झाडावरती बाटल्या टांगून त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत आहेत. त्यांची सर्वत्र चर्चा होऊन सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या तरुणांचा कामाचा आदर्श इतरांनी घेणे आवश्यक आहे.