सातारा - यवतेश्वर घाटात कड्यावरुन उडी घेऊन साताऱ्यातील 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे घडली. पोलिसांना घटनास्थळी मुलीचे आधार कार्ड सापडल्याने ओळख पटली आहे.
येवतेश्वर रस्त्यावर बुधवारी सकाळी दरीच्या बाजूस असलेल्या ओघळीत अनोळखी युवतीचा मृतदेह असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह सुमारे 50 फूट खाली अडचणीच्या ठिकाणी असल्याने ट्रेकर्सना पाचारण करण्यात आले. सुमारे एका तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.
तो मृतदेह बेपत्ता युवतीचा
घटनास्थळी पोलिसांना आधार कार्ड मिळाल्याने त्या मुलीचे नाव स्पष्ट झाले. बेपत्ता दाखल बाबत माहिती घेत तिच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली. शहर पोलीस ठाण्यात एक युवती बेपत्ता झाल्याची नोंद आहे. दरीत सापडलेला मृतदेह त्या बेपत्ता मुलीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, कुटुंबीयांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आक्रोश केला. पोलिसांना मुलीची डायरी सापडल्यानंतर त्याची माहिती घेतली असता त्यामध्ये शेरोशायरीसह 1 एप्रिलपासून दैनंदिनी लिहिलेली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसून नैराश्यातून हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप ५ न्यूज-