सातारा:आज देशात केवळ लोकशाहीवरच नाही तर संपूर्ण राज्यघटने वर संकट आहे. देशात लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. याविरोधात आवाज उठविण्याची गरज होती. तो आवाज राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेमुळे (Bharat Jodo Yatra) बुलंद होईल. ही भारत जोडो यात्रा देशातील जनतेचे मौन तोडेल, असा विश्वास स्वराज्य इंडिया पार्टीचे राष्ट्रीय नेते योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर उपस्थित होते.
देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचे प्रयत्न:केजरीवाल सरकारचा दाखला देत योगेंद्र यादव म्हणाले की, दिल्लीत एक मंत्री डॉ. बाबासाहेबांची शपथ घेतो. त्याच्या विरोधात भाजप देशभर आंदोलन करते आणि आम आदमी पार्टी त्याला पक्षातून काढून टाकते. आज त्याच पध्दतीने हिंदुत्वाच्या आडून देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशात लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. हे महाराष्ट्रात येऊन सांगण्याची गरज नाही. कारण, महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर कसे सरकार बनले आहे तो गुवाहाटीवाला ड्रामा संपुर्ण देशाने पाहिला आहे. या देशातील धर्मनिरपेक्षता संपवून टाकली आहे. तथाकथित धर्म संसदेच्या नावावर एखाद्या समुदायाच्या लोकांना मारण्याचे खुले आवाहन केले जात आहे. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद होत नाही आणि कोणाला तुरूंगातही जावे लागत नाही. हे सर्व सत्तेच्या आशिर्वादाने होते, असा आरोपही त्यांनी केला.