सातारा- संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा आज ३६वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त कराडच्या प्रीतिसंगमावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. नेहमीच या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे शरद पवार मात्र यावर्षी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या नेत्यांनी हजेरी लावून स्व. यशवंतराव चव्हाण यांना स्मृतीदिनी प्रीतिसंगमावरील समाधीवर आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील स्व. यशवंतराव चव्हाण स्मारकातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने ते कराडला आले नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्यावतीने यशवंतरावांना आदरांजली वाहिली. त्यांच्यासह माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलीमा येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्यांनीही स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले.
यशवंतरावांचे बालपण -
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ मध्ये देवराष्ट्र गावात झाला. बालपणातच वडिलांचे निधन झाल्यानंतर आई विठाबाई यांनी भावाच्या मदतीने मुलांना सांभाळले. यशवंतरावांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यामुळे मराठी सोबतच संस्कृत आणि इंग्रजीचेही त्यांनी अफाट वाचन केले होते. वडील लहानपणीच गेल्यामुळे चव्हाण कुटुंबाना गरीबीचा सामना करावा लागला, शाळेचे शुल्क सुद्धा भरणे त्यांना अशक्य होत होते. तरीही शिक्षण चालूच ठेवायचा निर्धार त्यांनी केला होता.
गांधीचा अहिंसेचा मार्ग स्वीकारला -