महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 11, 2020, 10:29 PM IST

ETV Bharat / state

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत औंध येथील श्रीयमाईदेवी रथोत्सव पार पडला

महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाईदेवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. "आई उदे ग अंबे उदेच्या "जयघोषाने औधनगरी दुमदुमून गेली होती.

yamai-devis-rath-festival-in-aundh-was-held-in-presence-of-deputy-chief-minister-ajit-pawar
औंध येथील श्रीयमाईदेवी रथोत्सव पार पडला

सातारा -शंभर वर्षाहुन अधिक वर्षाची परंपरा लाभलेल्या औंधच्या श्रीयमाईदेवी रथोत्सवास दुपारी सव्वा बारा वाजता प्रारंभ झाला. त्याअगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार व श्रीयमाई देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामनिवासिनी श्रीयमाई देवी मंदिरामध्ये श्रीयमाईदेवीच्या उत्सवमूर्तीचे विधीवतपणे षोडषोपचारे पूजन करण्यात आले. देवीची उत्थापना करून देवीची उत्सवमूर्ती सभामंडपात राजकन्या श्रीमंत चारुशीलाराजे यांच्या हस्ते आणण्यात आली. यावेळी राजकन्या चारुशीलाराजे यांच्या हस्ते देवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करण्यात आले.

औंध येथील श्रीयमाईदेवी रथोत्सव पार पडला

यावेळी गणेश इंगळे, हेमंत हिंगे, अनिकेत इंगळे, यांनी पौरोहित्य व मंत्रपठन केले. दुध,दही,पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची चौपाळयाजवळ प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्याठिकाणी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विधीवतपणे देवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर येथील ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यव्रूंदाच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली. त्याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देवीची ऐतिहासिक दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राजकन्या चारूशीलाराजे, यझदी बाबा, रोशन खंबाटा, माजी आमदार प्रभाकर घार्गे, शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दिपक नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर श्रीयमाईदेवीच्या रथोत्सवास उत्साही मंगलमय वातावरणात सुरूवात झाली. यावेळी- रथाचे मानकरी माळी, भाविक, ग्रामस्थ यांनी रथ ओढून मिरवणूकीस प्रारंभ केला. यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी श्रीयमाई देवीचे दर्शन घेऊन रथावर एक रूपयांपासून ते दहा हजार रूपयांपर्यंतच्या नोटा, नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, गुलाल खोबरे अर्पण केले व आई उदे ग अंबे उदेचा जयघोष केला. यावेळी रथाच्या अग्रभागी तेलभूते, डवरी, सनईवाले, गोंधळी, दांडपट्टेवाले, आराधी, घडशी या देवीच्या सेवेकऱ्यानी वेगवेगळया पेहरावात देवी चरणी आपली सेवा, कला सादर केली.

रथासमोर वाद्य पथके, लेझीम, बँड पथके, मोठया प्रमाणात सहभागी झाली होती. श्रीयमाई श्रीनिवास विद्यालयाचे लेझीम, झांज पथक तसेच माध्यमिक आश्रमशाळेचे लेझीम पथक. रथोत्सव मिरवणूक चावडी चौक, मारूती मंदिर, बालविकास मार्गे ऐतिहासिक पद्माळे तळयावर नेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी उशीरा पद्माळे तळयामध्ये देवीस अभिषेक करुन पंचोपचारे पूजन करण्यात आले. हा रथोत्सव सोहळा सुमारे सहा तास चालला.

दरम्यान रथोत्सवाच्या पूर्वसंध्येला शाकंभरी पौर्णिमेनिमित्त श्रीयमाईदेवीचे पूजन करून पालखीतून मिरवणूक काढून ऐतिहासिक, धार्मिक परंपरेनुसार काळयापाषाणातील दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली. हा ऐतिहासिक सोहळा दीपमाळ प्रज्वलनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविक, ग्रामस्थ महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी, आब्बास आतार, प्रशांत खैरमोडे, संतोष भोसले, इलियास पटवेकरी, प्रदिप कणसे, संजय निकम, रमेश जगदाळे, शंकरराव खैरमोडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य रथाचे सर्व मानकरी परिसरातील विविध गावचे सरपंच, सोसायटी चेअरमन, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details