सातारा- जिल्ह्यातील सीएए, एनआरसीविरोधी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात लेक लाडकी अभियान, नवयान महाजलसा, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, मुक्तीवादी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, जमियात उलेमा ए हिंद, मुस्लीम जागृती अभियान अशा विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. हे आंदोलन रोज सकाळी ११ वाजता सुरू राहणार आहे.
'सीएए'विरोधात महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत आंदोलन हेही वाचा -कराडवर धुक्याची चादर, प्रितीसंगम हरवले दाट धुक्यात
केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकासह राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. देशभरात महिलांनी या आंदोलनाची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. साताऱ्यातील महिलांनीही आता पुढाकार घेतला आहे.
दिल्लीतील आंदोलनकर्त्या महिलांना पाठिंबा जाहीर करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या एनआरसी आणि सीएएच्या विरोधात निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर सरकार सीएएमध्ये बदल करत नाही व एनआरसी लागू करणार नाही, असे जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे या महिलांनी सांगितले.
मुक्ती अब्दुल हमीद व मौलाना जमीर यांनी प्रस्ताविक करत एनआरसी व सीएए हे देशविरोधी व संविधानविरोधी कशी आहे हे सांगितले. लेक लाडकी अभियानाच्या वर्षा देशपांडे यांनी आंदोलनाला मार्गदर्शन करत हम भारत कि नारी है और आंधी के साथ चिंगारी है, अशा घोषणा देत एनआरसी व सीएएचा कडाडून विरोध केला.
आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत खंडाईत, सातारा शहराचे मुफ्ती साहेब, जमियत उलेमा-ए-हिंदचे मौलाना जमीर, मुक्तीवादी संघटनेचे अॅड. मिलिंद पवार, जयंत उथळे, अक्षर मानवचे अॅड. राजेंद्र गलांडे, कॉ. वसंत नलावडे, अमजदभाई शेख व पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.