सातारा - सुट्टीसाठी माहेरी आलेल्या महिलेने गुरुवारी मध्यरात्री झोपेत असणाऱ्या आपल्या दोन मुलांना घेऊन कोयना नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. शुक्रवारी दुपारी या घटनेतील एका बालकाचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. कोयना नदीला सोडलेल्या पाण्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या मुलाचा व आईचा शोध लागला नव्हता. दरम्यान, या घटनेची माहिती मृताचे मामा सोपान ईश्वर पाटील (वय 25) यांनी पाटण पोलीस ठाण्यात दिली.
दोन मुलांसह महिलेची कोयना नदीत आत्महत्या, एका बालकाचा मृतदेह सापडला - सातारा पोलीस लेटेस्ट न्यूज
सुट्टीसाठी माहेरी आलेल्या महिलेने गुरुवारी मध्यरात्री झोपेत असणाऱ्या दोन मुलांसह कोयना नदीत आत्महत्या केली. कोयना नदी पत्रात पोलीस शोध घेत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड (तामाण) येथील राधिका मनोजकुमार माने (वय 27) या आपल्या आपल्या दोन मुलांसह(सांगवड, ता पाटण) माहेरी काही दिवसांसाठी राहण्यासाठी आल्या होत्या. मात्र, गुरुवारी मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना राधिका यांनी श्रावण (वय ३) आणि शिवराज (वय ९ महिने) या झोपेत असलेल्या दोन मुलांना घेऊन घरा शेजारच्या कोयना नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. पहाटे झोपेतून उठल्यानंतर घरचे सर्वजण त्यांचा शोध घेऊ लागले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास लहान बाळ शिवराज याचा मृतदेह कोयना नदीच्या पात्रात आढळून आला. या घटनेमुळे राधिका यांचा भाऊ सोपान ईश्वर पाटील यांनी या घटनेची माहिती पाटण पोलिसांना दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शिंदे, के. बी. गोतपागर, सहाय्यक फौजदार एस. आर. कोळी यांचे पथक तातडीने सांगवड येथे घटनास्थळी दाखल झाले. राधिका आणि श्रावण यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. मात्र, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली? ते अद्याप समजू शकलेले नाही.