सातारा- राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे उदयनराजे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर तर नाहीत ना, अशा चर्चांना उधाण आले आहे.
पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी खासदार उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - वर्षा निवासस्थानी भेट
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
![पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी खासदार उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4201322-816-4201322-1566394234801.jpg)
राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे यांनी नुकताच भाजप प्रवेश केला. शिवाय रामराजे निंबाळकर देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. उदयनराजे आपला खासदारकीचा राजीनामा देऊन सातारा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा पोटनिवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. मंगळवारी चार वाजता शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांसोबत मुख्यमंत्र्याची भेट घेतली. त्यावेळी उदयनराजे हजर नव्हते. त्यापूर्वीच उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती संदर्भात बुधवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उदयनराजे भेटले. पूरग्रस्त भागातील लोकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणेबाबत तसेच ताबडतोब नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे उदयनराजे यांनी सांगितले आहे.