सातारा - अतित (ता. सातारा) येथे रानडुकरांची शिकार करून त्याची मांस विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणातील सुमारे ७० किलो मांस आणि मांस खरेदी करणाऱयाला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. दोन विक्रेतेघटनास्थळावरुन फरार झाले आहेत.
रानडुक्कराच्या मांसासह खरेदीदार वनविभागाच्या जाळ्यात ; शिकारी फरार गोपनिय माहिती मिळाली -
वनाधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अतित-मांडवे परिसरात वन्यप्राण्याची शिकार करून त्याच्या मांसाची विक्री सुरू असल्याची माहिती वनक्षेत्रपाल शितल राठोड यांना मिळाली. त्यांनी तातडीने आपल्या सहकाऱयांना निसराळे फाटा परिसरात माहितीची खात्री करण्यासाठी पाठवले. मिळालेल्या माहितीत तथ्य आढळल्यानंतर अन्य कर्मचाऱयांसह शितल राठोड घटनास्थळी पोहोचल्या. वनविभागाची गाडी पाहताच मांस विक्री करणाऱयांनी मुद्देमाल, गाड्या आहे तिथंच ठेऊन पलायन केले. वाहनांच्या क्रमांकावरून संबंधितांना शोधण्याचे काम सुरू आहे.
७० किलो मास जप्त -
वनविभागाने ७० किलो मांस, रानडुक्कराच्या पायाची ८ खुरे, लोखंडी तराजू, चाकु, २ दुचाकी, मोबाईल, यासह मांस खरेदी करायला आलेला समर्थगाव (ता. सातारा) येथील सचिन तुकाराम ताटे याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत वनपाल कुशाल पावरा, वनरक्षक सुहास भोसले, राज मोसलगी, संजय धोंडवड, संतोष दळवी, वनमजुर गोरख शिरतोडे, वनरक्षक मारूती माने यांनी भाग घेतला. ही कारवाई वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत करण्यात आली.
३०० रूपये किलोने सुरू होती विक्री -
अतित ते खोडद रस्त्यालगत असणाऱया एका शेतात छोटी झोपडी तयार केली आहे. या झोपडीत ही मांस विक्री सुरू होती. परिसरातील ग्रामस्थ येथे मांस खरेदीसाठी येत होते. एका किलोचा दर ३०० रूपये होता. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी वन्यप्राण्याचे मांस खरेदी करणंही समर्थगावच्या सचिन तुकाराम ताटे याला चांगलेच महागात पडले.