सातारा : व्हेल मासा संरक्षित प्राणी असल्याने उलटीचा बेकायदेशीर वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत आहे. शहरात व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी अॅम्ब्युलन्समधून आलेल्या चौघांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सापळा रचून पकडले. संशय येऊ नये म्हणून चौघे तस्कर चक्क अॅम्ब्युलन्समधून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन आले होते. चारही तस्करांना पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून साडे पाच कोटी रूपये किंमतीची पाच व्हेल माशाची पाच किलो उलटी (अम्बरग्रीस) जप्त केली आहे. सिध्दार्थ विठ्ठल लाकडे, नासिक अहमद रहिमान, किरण गोविंद भाटकर (रा. रत्नागिरी) आणि अनिस इसा शेख (रा. हुपरी, कोल्हापूर), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
एलसीबीची धडाकेबाज कामगिरी: दिल्ली, उत्तर प्रदेशातून चारचाकी कार चोरणार्या तसेच दुचाकी चोरणार्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करणार्या सातारा एलसीबीने आणखी एक धडाकेबाज कामगिरी केली आहे. सातारा-पुणे मार्गावर चौघेजण अॅम्ब्युलन्समधून व्हेल माशाची उलटी घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबर्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (दि. 9) सापळा लावला. काही वेळाने एक अॅम्ब्युलन्स (क्र. एम. एच. 08 ए. पी. 3443) पुण्याकडून सातार्याकडे येताना दिसली. पोलिसांनी अॅम्ब्युलन्सची तपासणी केली असता, अॅम्ब्युलन्समध्ये एका पिशवीत व्हेल माशाची उलटी (अम्बरग्रीस) आढळून आली.
व्हेल माशाची उलटी प्रतिबंधीत पदार्थ: प्रतिबंधित असलेली व्हेल माशाची उलटी आढळल्याने पोलिसांनी वन अधिकार्यांना पाचारण केले. त्यांनी तो पदार्थ व्हेल माश्याची उलटी (अंबरग्रीस) असून प्रतिबंधीत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रती किलो 1 कोटी रुपये दराने ती विक्री जात असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी चौघाही तस्करांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात वन्यप्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली.