महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्हीच पृथ्वीराज चव्हाणांचे १९९९ ला डिपॉझिट वाचवले; उंडाळकरांचे हल्लासत्र सुरूच

चव्हाण ज्या तालुक्यातील आहेत. त्या पाटण तालुक्याने त्यांना फक्त ५००० मते दिली होती. इतके हे लोकप्रिय नेते आहेत, असा घणाघात माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांनी केला आहे.

By

Published : Oct 17, 2019, 11:39 PM IST

उंडाळकरांचे हल्लासत्र सुरूच

सातारा- काँग्रेस दुभंगल्यानंतर १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. त्यावेळी कराड दक्षिण मतदारसंघाने त्यांचे डिपॉझिट वाचवले होते. चव्हाण ज्या तालुक्यातील आहेत. त्या पाटण तालुक्याने त्यांना फक्त ५००० मते दिली होती. इतके हे लोकप्रिय नेते आहेत, असा घणाघात माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांनी केला आहे.

चव्हाणांनी कायम आयत्या पिठावर रेघोट्या रांगोळ्या ओढण्याचे काम केल्याची टीका करत उंडाळकरांनी चव्हाणांवरील हल्लासत्र सुरूच ठेवले आहे. कराड दक्षिणमधील रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अ‍ॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या प्रचारार्थ कराडच्या मंगळवार पेठेत झालेल्या सभेत विलासकाकांनी चव्हाणांवर पुन्हा निशाणा साधला. यावेळी सुभाष खोत, संजय कांबळे, सतीश पाटील, धनाजीराव पाटील, मानसिंगराव पाटील, प्रकाश जाधव, दिलीप घोडके, बाळासाहेब मोहिते, नदीम सुतार, विजय मुठेकर, अंकुश शिंदे उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे कुटुंब गेली ५० वर्षे सत्तेच्या वर्तुळात होते आणि आहे. परंतु, त्यांनी कोणतेही रचनात्मक विकासाचे काम केलेले नाही. योगदान शुन्य असताना कायमच ते आयत्या पिठावर रेघोट्या ओढत राहिल्याचा आरोप उंडाळकरांनी केला. दिल्ली दरबारी यशवंतराव चव्हाणांच्या चुगल्या करून यांनी स्वत:ची राजकीय पोळी भाजली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताच त्यांनी यशवंत विचारांचे राजकारण उद्धवस्त करण्याचे काम केले. नकारात्मक विचारसरणी आणि द्वेषाचे राजकारण करणार्‍या या प्रवृत्तीचा कराडकरांनी मतपेटीद्वारे पराभव करावा, असेही उंडाळकर म्हणाले.

गेल्या पाच वर्षात आमदार म्हणून कराड शहरासाठी किती विकास निधी आणला, हे प्रथम पृथ्वीराज चव्हाणांनी जाहीर करावे. आणि मगच मुख्यमंत्री असताना अमुक केले तमुक केल्याची टिमकी वाजवावी, असे आव्हान बाळासाहेब मोहिते यांनी चव्हाणांना दिले. २००९ ला कराड शहराचा दक्षिणमध्ये समावेश झाला. त्यावेळी विलासकाकांनी त्रिशंकू भाग कराड शहरात समाविष्ट करण्याबरोबर घरकुलाचा प्रश्न, रस्त्यांसाठी निधी, यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाच्या संरक्षण भिंतीचा प्रश्न, घनकचरा प्रकल्पासाठी २५ एकर जागेसह नगरपालिकेला आमदार फंडातून विविध कामांसाठी निधी मंजूर करून दिला होता. त्याचे अवलोकन कराडकरांनी करण्याचे आवाहन मोहिते यांनी केले.

हेही वाचा-सवाल कुछ और; जवाब कुछ और, शॉटगन शत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर निशाणा

कराड दक्षिणचे दोन्ही बाबा सत्तेसाठी हपापले असल्याचा टोला मारून विकास जाधव म्हणाले, दोघांनाही कराड दक्षिण मतदार संघाशी काहीही घेणे देणे नाही. त्यांना फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आमदारकी हवी आहे. कराड दक्षिणमधील जनतेने त्यांचा स्वार्थी डाव हाणून पाडण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे. स्वातंत्र्य लढ्याची कर्मभूमी म्हणून कराडची नोंद आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी या भूमीतूनच देशाचे नेतृत्व केले. त्यांनी सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन कराडचा लौकिक वाढवला होता.

हेही वाचा-ते चव्हाण कुठे आणि हे चव्हाण कुठे? उंडाळकरांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला

आम्हीही कराड शहर कराड दक्षिणेत आल्यानंतर स्वातंत्र्य सैनिक यशवंतराव मुळे यांच्या नावाने कराड शहरात कोयना नदीकाठी घाट बांधून दिला. कराड शहराच्या विकासाची कोंडी फोडून अनेक प्रश्न मार्गी लावले. कराडच्या तत्कालीन नगराध्यक्षा शारदाताई जाधव त्याच्या साक्षीदार आहेत, असेही विलासकाका उंडाळकरांनी कराडकरांना सांगितले.

हेही वाचा-शरद पवार उद्या शंभूराजसह उदयनराजेंचा घेणार समाचार

ABOUT THE AUTHOR

...view details