कराड (सातारा) -कोविड महामारीमुळे युवकांच्या ह्रदयातील नेता आम्ही गमावला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना कोरोनाने आमच्यापासून हिरावले होते. आता राजीव सातव यांचेही कोरोनाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
सातव यांच्या जाण्याने काँग्रेसचे मोठे नुकसान -
राजीव सातव यांनी अत्यंत कमी वयात स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते खासदार होण्यापर्यंत मजल मारली. त्यांना अखिल भारतीय युवक काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. प्रत्येक संधीचे सोने त्यांनी केले. देशातील तरुण, होतकरु नेता म्हणून त्यांची ख्याती होती. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून अनेक राज्यांची जबाबदारी त्यांनी पेलली होती. गुजरातचे प्रभारी या नात्याने गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी मोलाची कामगिरी करत काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले. त्यांची पक्षाच्या संघटनात्मक कामाची पद्धत आणि तळमळ अभिमानस्पद होती. युवक काँग्रेसच्या कारिकर्दीत त्यांनी युवा नेत्यांचा मोठा परिवार उभा केला. काँग्रेस नेतृत्वाचा त्यांचावर प्रचंड मोठा विश्वास होता, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच राजीव सातव यांचे संसदेमधील कार्य उत्तम होते. त्यांनी स्वतःला संघटनेच्या कामासाठी वाहून घेतले होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे आणि अखिल भारतीय काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा - गोव्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका; दोघांचा मृत्यू, २०० घरांचे नुकसान