सातारा - कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन सांगली जिल्ह्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी कोयना, कृष्णा, वारणा, पंचगंगा, वेदगंगा या नद्यांच्या पाणी पातळीवर आणि कोयना परिसरात पडणाऱ्या पावसावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. पूर परिस्थितीमुळे जनतेचे नुकसान होण्यापेक्षा दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी देण्याची आमची भूमिका आहे. राज्याचे वरदायिनी असलेले कोयना धरण हे दुष्काळी तालुक्यातील जनतेसाठी भाग्यलक्ष्मी ठरत आहे. कुठेही पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही सतर्क असून संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाटण येथील पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
'पूर परिस्थितीमुळे नुकसान होण्यापेक्षा दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी देण्याची आमची भूमिका'
कुठेही पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही सतर्क असून संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाटण येथील पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पाटण येथील माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या शिक्का मेंशन या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, ‘कोयना धरण परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु असल्याने धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 92 टीएमसी पर्यत पोहचला आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. हे पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी टेम्भू, मैसाळ योजनाही सुरू करण्यात आली आहे.’
तसेच उरमोडी योजनाही लवकरच सुरू होईल. या माध्यमातून दुष्काळी भागातील सांगोल्यापर्यंतचे सर्व तलाव भरण्याचे आमचे उद्दिष्ठ आहे. याद्वारे दुष्काळ भागाला पाणी देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर सांगली येथील आयुर्विन पुलाची पाणीपातळी 40 फुटापेक्षा जास्त होऊ नये यासाठी कोयना, कृष्णा, वारणा, पंचगंगा, वेदगंगा या नद्यांच्या पाणी पातळीवर आणि कोयना परिसरात पडणाऱ्या पावसावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. पूर परिस्थिती कोठेही निर्माण होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत. तशा अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले.