सातारा-कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. यामुळे कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी परिसरातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढतच चालले आहे. सध्या येथे प्रतिसेकंद सरासरी 12 हजार 337 क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठ्यातही अपेक्षीत वाढ होत आहे. धरणात सध्या एकूण उपलब्ध पाणीसाठा 33.69 टीएमसी झाला आहे.
शनिवारी पहाटेपासूनच पाटण तालुक्यात पावसाने सुरूवात केली.रविवारी पहाटे पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढले आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद सरासरी 12 हजार 337 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्याचवेळी पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करुन पूर्वेकडे सिंचनासाठी प्रतिसेकंद 2 हजार 111 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातंर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढल्याने धरणातील पाणीसाठा व पाणीपातळीत अपेक्षित वाढ होत आहे.