सातारा :जिल्ह्यातील कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यात जोरदार वारे व दमदार पाऊस पडत आहे. मंगळवार ते बुधवार 5 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत कोयना धरणातील पाणीसाठ्यात तब्बल 8 टिएमसीने तर पाणीउंचीत 9.1 फुटाने वाढ झाली आहे. याच चोवीस तासांत धरणातंर्गत विभागातील कोयनानगर येथे 225 मिलीमीटर, नवजा 328 मिलीमीटर, महाबळेश्वर 345 मिलीमीटर व वळवण येथे 277 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून सध्या प्रतिसेकंद सरासरी 92,017 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होवून आता उपलब्ध एकूण पाणीसाठा 62.93 टिएमसी इतका झाला आहे. 105 टिएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 42.07 टिएमसी पाण्याची गरज आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर येत्या आठवडाभरातच हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल. त्यानंतरचा पाऊस व धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन लवकरच धरणाचे 6 वक्री दरवाजे वर उचलून त्यातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्याच्या शक्यताही व्यक्त केल्या जात आहेत.