सातारा - वाईमार्गे पाचगणी-महाबळेश्वरकडे व कोकणात जाणारा रस्ता पसरणी घाटात दुरुस्तीच्या कामामुळे आज (30 जून) पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. येथील वाहतूक पाचवड कुडाळ व नागेवाडी, वाई मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाईमार्गे पसरणी घाटातून महाबळेश्वरला निघाला असाल तर थोडं थांबावं लागेल.
संरक्षक भिंतींची दुरुस्ती
पसरणी घाटामधील मोऱ्या व संरक्षक भिंती सततच्या पावसामुळे पडलेल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झालेला आहे. त्याची दुरुस्ती करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यासाठी मोरीचे व संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु झाले आहे. मोठमोठ्या यंत्रसामुग्री वापरून ही दुरुस्ती सुरु असल्याची माहिती उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी दिली.