महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाई गांजा लागवड प्रकरण: काही स्थानिक चौकशीसाठी ताब्यात, परदेशी नागरिकांना कोठडी

वाईतील गांजा लागवड प्रकरणी पोलिसांनी काही स्थानिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.

वाई गांजा लागवड प्रकरण
वाई गांजा लागवड प्रकरण

By

Published : Feb 18, 2021, 7:57 PM IST

सातारा - वाईतील गांजा लागवड प्रकरणी पोलिसांनी काही स्थानिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. या परदेशी युवकांच्या संपर्कातील काहीजण फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. अटकेत असलेल्या दोन्ही परदेशी नागरिकांची वाई न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.

पोलिसांना मिळाली होती टिप-

वाई शहरातील नंदनवन कॉलनीतील विष्णू श्री स्मृती बंगल्यात दोन परदेशी युवक गेली अनेक महिने वास्तव्याला होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार कुंभार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय भोसले यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. भोसले यांनी मिळालेल्या सुचनांनुसार विष्णू श्री स्मृती या बंगल्यात धाड टाकली. पोलिसांनी दोन परदेशी युवकांना पारपत्र व रहिवास परवाना नसल्याप्रकरणी ताब्यात घेतले. घरझडती घेत असताना घरामध्ये गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याचे आढळून आले. याबाबत पोलिसांनी पुण्याहून न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ञांची मदत घेतली. गांजाची खात्री झाल्यानंतर परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवार २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. सर्गीस व्हिक्‍टर मानका (वय 31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 दोन्ही रा.जर्मनी,सध्या रा. नंदनवन कॉलनी,वाई) अशी अटक केल्यांची नावे आहेत.

कुंड्यांमध्ये गांजाची लागवड-

पोलिसांनी संपूर्ण बंगल्याची झडती घेण्यास सुरूवात केली असता, अचंबित करणारा प्रकार समोर आला. हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून बंगल्याच्या तीन बेडरूममध्ये, गॅलरीत, टेरेसवर कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोन लाख 36 हजार रूपये किंमतीचा 29 किलो गांजा, दहा हजार रूपये कींमतीचे कोको पीट, केमिकल फवारणी पंप, एसी, फॅन, बॅटरी, दोन दुचाकी, लॅपटॉप, मोबाइल असा एकूण आठ लाख 21 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटकेच्या भितीने काही संशयित फरार

चौकशीकामी परदेशी युवक कोणतेही सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात आले. ही गांजा सदृश्य वनस्पती नसून औषधी वनस्पती असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. या परदेशी नागरिकांना घर उपलब्ध करून देणारे व त्यांच्या संपर्कात असणाऱ्या काही स्थानिकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर पोलीस चौकशीसाठी बोलावतील व अटक करतील या भीतीने अनेक जण फरार झाल्याची माहिती मिळत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करत आहेत.

हेही वाचा-महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढता; विदर्भामध्ये स्थिती चिंताजनक

ABOUT THE AUTHOR

...view details