सातारा : माण-खटाव तालुक्याच्या 32 गावांच्या शेजारून टेंभू योजनेचा जलसेतू जात असून केवळ पाणी योजनेत या गावांचा समावेश नसल्याचे कारण देत या गावांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तालुक्यातील 32 गावांना टेंभू उपसा जल सिंचन योजनेतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळाले पाहिजे. आचारसंहिता लागायच्या अगोदर पाणी दिले नाही तर आम्ही सगळे 32 गावातील नागरिक मतदानावर बहिष्कार घालणार असून एक महिन्याची मुदत आम्ही सरकारला देत आहोत, अशी घोषणा गावकऱ्यांनी केली आहे. शनिवारी कुकुडवाड येथे भरवलेल्या एल्गार परिषदेत गावकऱ्यांनी ही घोषणा केली.
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून 32 गावातील शेतकरी आपली जनावरे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोडतील. दुसऱ्या टप्पात 20 ऑगस्टला आम्ही सगळे लोक चितळी येतील कॅनॉलमध्ये सामूदायिक जलसमाधी घेणार तसेच कॅनॉल देखील फोडणार आहोत, असा निर्णय एल्गार परिषदेत घेण्यात आला आहे.