सातारा - येत्या २१ तारखेला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर पक्षाकडून एकमेंकावर टीका होत आहेत. माजी सहकार मंत्री विलास पाटील-उंडाळकर यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसलेंवर पुन्हा निशाना साधला आहे. एका उमेदवाराने स्व. यशवंतराव चव्हाणांचे विचार आणि संस्कृती, तर दुसर्या उमेदवाराने वाममार्गाने मिळविलेल्या पैशाच्या जोरावर कराड दक्षिण मतदार संघ उध्वस्त केल्याचे ते जाहीर सभेत बोलताना म्हणाले. याचबरोबर त्यांनी रयत संघटनेचा उमेदवारच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा -कराड उत्तरमधील परिवर्तनाची लढाई जिंकणारच - धैर्यशील कदम
विरोधातील दोन्ही उमेदवार वेगळ्याच मुद्यांवर लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केली. विद्यमान आमदारांनी मागच्या निवडणुकीत दिलेली किती आश्वासने पाळली याचा जाब विचारण्याची ही वेळ आहे. संकटकाळात नेहमीच आम्ही बहुजन, वंचित अल्पसंख्यांक व व्यापारी समाजासह सर्वसामान्यांच्या बाजूने राहिलो आहोत. कराड ही स्वातंत्र्य सैनिकांचे केंद्र असून स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विचार जोपासण्यासाठी आम्ही संघटनेमार्फत उदयसिंह पाटील यांना उमेदवारी दिली. कराडच्या जनतेने त्यांना पाठिंबा देऊन विजयी करावे, असेही उंडाळकर यांनी लोकांना केले. आता मतदार जागा झाला असून उद्याची पहाट रयत संघटनेसाठी निश्चितच गुलाल घेऊन येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.