कराड (सातारा) - अनैतिक संबंधाच्या संशयावरून डोळ्यात चटणी टाकून भाजी विक्रेत्याची तलवारीने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कराड-पुसेसावळी मार्गावरील वाघेरी (ता. कराड) हद्दीत शनिवारी (दि. 25) रात्री उशीरा ही घटना घडली. रमेश रामचंद्र पवार (वय 40, रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे हत्या करण्यात आलेल्या भाजी विक्रेत्याचे नाव असून याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
चौघांना अटक -
मृताचा भावाने कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेल्या फिर्यादीमध्ये दीपक इंगळे, संदीप इंगळे आणि अनोळखी दोघे अशा चौघांनी रमेश याचा खून केल्याचे म्हटले होते. त्याआधारे कराड ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयितांना अटक केली आहे.
भाजीपाला आणण्यासाठी केले होते कराडला -
फिर्यादी नवनाथ पवार आणि त्याचा भाऊ रमेश पवार हे दोघेजण कोरेगाव तालुक्यातील असून भाजीपाला विक्रीचा फिरता व्यवसाय करीत होते. संशयीत आरोपी दीपक इंगळे हा त्यांच्याच गावचा रहिवासी आहे. त्याची पत्नी व रमेश पवार यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय दीपकला होता. त्यावरून दीपक आणि रमेश यांच्यात दोन दिवसापूर्वी किरकोळ वाद झाला होता. शनिवारी (दि. 25) दुपारी रमेश हा गावातील लखन बालेखान मुलाणी यांच्या बोलेरो गाडीतून भाजीपाला आणण्यासाठी कराडला आला होता. त्याच्यासोबत गाडीचालक लखन मुलाणी, अमर नेटके, दत्तात्रय पवार होते.