सातारा- प्रतापगडाच्या रणसंग्रामात छत्रपती शिवरायांच्या प्राणाचे रक्षण करणाऱ्या वीर जीवा महालांच्या वारसाचे शिक्षण तुटपुंज्या आर्थिक स्थितीमुळे अडखळले होते. 'ईटीव्ही भारत'ने त्यावर प्रकाश टाकत 19 फेब्रुवारी रोजी बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीची दखल घेत पाचगणीच्या बेल एअर रुग्णालयाने या कुटुंबाला आधार देत महालांचे वंशज प्रतीक्षा सपकाळ हिच्या दोन वर्षांच्या नर्सिंग अभ्यासक्रमाची जबाबदारी घेतली. यामुळे प्रतीक्षा सपकाळने 'ईटीव्ही भारत'चे आभार मानले.
वाई तालुक्यातील कोंढवली या छोट्याशा गावात वीर जीवा महाले यांचे 14 वे वंशज प्रकाश सपकाळ, पत्नी जयश्री, मुलगी प्रतीक्षा व मुलगा प्रतीक यांसह राहतात. प्रकाश सपकाळ यांना अर्धांगवायू झाल्याने ते अंथरूणात खिळून आहेत. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी जयश्री सपकाळ या शेतात मजुरी करतात. त्यांची मुलगी प्रतीक्षाला 12 वी इयत्तेत चांगले गुण मिळूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे प्रतीक्षाला पुढचे शिक्षण घेणे कठीण झाले होते. तिला नर्स (परिचारिका) व्हायचे होते. पण, आर्थिक अडचणीमुळे नर्सिंगचा प्रवेश खोळंबला होता.
याबाबतची माहिती समजल्यानंतर 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने शिवजयंतीचे औचित्य साधून सपकाळ कुटुंबीयांवर प्रकाश झोत टाकला होता. साताऱ्यातील प्रसिद्ध आर्किटेक्ट ययाती टपळे यांनी बातमीची माहिती पाचगणीच्या बेल एअर रुग्णालयाचे संचालक फादर टॉमी यांना दिली. फादर टॉमी यांनी प्रतीक्षा व तिची आई जयश्री यांची भेट घेतली. शैक्षणिक पात्रता तपासून तिला 12 वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. त्यावेळी 'एएनएम' या नर्सिंगच्या 2 वर्षांच्या अभ्यासक्रमाला तिला प्रवेश मिळू शकेल, असे बेल एअर रूग्मालयाचे संचालक फादर टॉमी यांनी आश्वासित केल्याचे प्रतीक्षाची आई जयश्री यांनी सांगितले.
प्रतिक्षाच्या शैक्षणिक खर्चासह होस्टेल, जेवणाचा खर्च बेल एअर रुग्णालय उचलणार आहे, असेही फादर टॉमी यांनी स्पष्ट केले.