महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पश्चिम घाटातील ‘ती’ 27 गावे केंद्रीय मंत्र्याच्या बॉक्साईट खाणींसाठी वगळण्याच्या हालचाली? - बॉक्साईट खाणीची बातमी

महाराष्ट्रातील एका केंद्रीय मंत्र्यांच्या बॉक्साईट खाणींसाठी पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रात मोडणार्‍या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 27 गावे वगळण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र ही गावे वगळू नयेत, अशी विनंती वन्यजीव खात्याने मुख्यमंत्री कार्यालयाकडे एका पत्राद्वारे केली आहे.

27 villages in the Western Ghats for bauxite mines
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक सत्यजित गुजर

By

Published : May 27, 2020, 3:18 PM IST

कराड (सातारा) - महाराष्ट्रातील एका केंद्रीय मंत्र्यांच्या बॉक्साईट खाणींसाठी पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रात मोडणार्‍या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 27 गावे वगळण्याच्या हालचाली सुरू आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्याचे गाभा (कोअर) व झालर (बफर) क्षेत्र, तसेच तिल्लारी ते राधानगरी अभयारण्या दरम्यान असलेल्या वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वाच्या गावांचा त्यामध्ये समावेश आहे.

मात्र ही गावे वगळू नयेत, अशी विनंती वन्यजीव खात्याने मुख्यमंत्री कार्यालयाकडे एका पत्राद्वारे केली आहे. त्याची दखल घेत प्रस्तावित केलेल्या 388 गावांमधील वन्य जीवांसंदर्भातील महत्त्वाच्या गावांची वास्तविकता तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक सत्यजित गुजर

गेल्या आठवड्यात केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्राबाबत राज्य सरकारची बैठक झाली. या बैठकीत पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी 2092 गावांची अंतिम यादी प्रस्तावित करण्यात आली. यामध्ये जुन्या यादीतील 388 गावे वगळून 347 नव्या गावांचा समावेश करण्यात आला. ही यादी मागील सरकारच्या काळातच तयार करण्यात आली होती. मात्र, नव्या सरकारने त्यामध्ये छानणी न करता ती प्रस्तावित केली. वगळलेल्या 388 गावांमध्ये सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यजीव भ्रमणमार्गाच्या (वाघ-हत्ती) अनुषंगाने महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्याच्या गाभा व बफर क्षेत्रातील गावे देखील त्यात आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील 55 गावांचा समावेश होतो, तर बफर क्षेत्रात याच जिह्यातील 84 गावे समाविष्ट आहेत. त्यातील पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट असलेल्या 11 गावांचा समावेश 388 गावांमध्ये करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारी ते राधानगरी दरम्यान असलेल्या वाघ व हत्तींच्या भ्रमणमार्गातील 16 महत्त्वाची गावेही वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.


पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून ही गावे वगळू नयेत, अशी विनंती वन्यजीव विभागामार्फत महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक सत्यजित गुजर यांनी दिली आहे. ही गावे वगळल्यास त्याचा परिणाम वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षणावर होणार आहे. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी पश्चिम घाट संवदेनशील क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या 388 गावांमधील वन्य जीवांसंदर्भातील महत्त्वाच्या गावांची वास्तविकता तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाल्याचे सांगितले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यजीवांच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असणार्‍या गावांची यादी आम्ही पाठवणार आहोत, अशी माहितीही काकोडकर यांनी दिली आहे.
पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रात एका केंद्रीय मंत्र्यांना बॉक्साईट खाणी सुरू करायच्या आहेत. त्यासाठी संवेदन क्षेत्रातील गावे वगळण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांसह वन्यजीव रक्षक आणि वन्यजीव अभ्यासक अस्वस्थ आहेत. त्यांनी ही गावे वगळल्यास वन्यजीवांवर होणारे संभाव्य परिणाम सरकारच्या निदर्शनास आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

पश्चिम घाटातील ‘ती’ 27 गावे पुढील प्रमाणे :

* सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र - शाहुवाडी तालुक्यातील निवळे (गाभा क्षेत्र), उदगिरी (बफर क्षेत्र) आणि सांगली शिराळा तालुक्यातील मणदूर (बफर क्षेत्र)

* व्याघ्र संवर्धन आराखडा - केंद्राने 2013 साली मंजूर केलेल्या व्याघ्र संवर्धन आराखड्यामधील वाघांच्या भ्रमणमार्गात कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील 42 गावांचा समावेश होतो. त्यामधील कोल्हापूर-शाहूवाडी तालु्क्यातील मानोली, धनगरवाडी, येळवण-जुगाई

* राधानगरी अभयारण्य क्षेत्र - राधानगरी तालुक्यातील सावर्दे, रामणवाडी, पाटपन्हाळा, पडसाळी

* राधानगरी अभयारण्य पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र - राधानगरी तालुक्यातील पडसाळी

* तिल्लारी-राधानगरी वन्यजीव भ्रमणमार्ग -चंदगड तालुक्यातील भोगोली, पिलानी, कानुर खुर्द आणि सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुक्यातील असनिये, बाबळाट, दाभिल, कोणास, देगवे, फणसवडे, केसारी, आंबेगाव, कुणकेरी, माडखोल, पाडवेमाजगाव, सारमाले, तांबोळी.

ABOUT THE AUTHOR

...view details