सातारा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातीलच नव्हेतर देशातील जनतेचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमधील मिळकतधारकांची यावर्षीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी शासनाकडे करत उदयनराजे भोसले पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. २४ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे सर्वांचे उद्योग व कामधंदे बंद राहिले. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांसमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले असतानाही सामान्य माणूस जगला पाहिजे, म्हणून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यशासनही कृषी विषयक, तसेच वीजबिलाबाबत नागरिकांना सवलत देण्यासह अनेक उपाय योजत आहे, असे उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.