सातारा -खासदार उदयनराजे भोसले हे सातार्यातील तरूणांचे स्टाईल आयकॉन आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात रॉयल एन्ट्री करत कॉलर उडवून ते चाहत्यांना खूश करतात. त्याचीच झलक उदयनराजेंनी गांधी मैदानावरील शरीर सौष्ठव स्पर्धेत दाखवली. आपल्या स्टाईलने कॉलर उडवत उदयनराजे म्हणाले, मी पोझ मारली तर इथं कुणी थांबणार नाही. तसेच माझे वय मी सांगणार नाही आणि कोणी सांगितले तर याद राखा, अशी प्रेमळ तंबी देखील त्यांनी आपल्या चाहत्यांना दिली.
माझे वय सांगितले तर याद राखा :गांधी मैदानावरील शरीर सौष्ठव स्पर्धेत हजेरी लावल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी कॉलर उडवून चाहत्यांना खूश केले. या स्पर्धेसाठी अभिनेता अनुप सिंह ठाकूर उपस्थित होते. यावेळी उदयनराजेंनी आपल्या भाषणात गमतीदार टोलेबाजी केली. उदयनराजे भोसले म्हणाले की, माझे वय मी, सांगणार नाही आणि कुणी सांगायचा प्रयत्न केला तर याद राखा. कार्यकर्त्यांनी त्यांना पोझ देण्याची मागणी केली असता उदयनराजे म्हणाले, मी जर स्पर्धेत पोज मारायला लागलो तर, इथे कोण थांबणार नाही. उदयनराजेंच्या या फटकेबाजीला समर्थकांनी टाळ्या, शिट्ट्यांनी दाद दिली.
कार्यकर्त्यांना खास स्टाईलने शुभेच्छा :कार्यकर्त्यांना जपण्याची उदयनराजेंची हटके स्टाईल असते. एका कार्यकर्त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त चक्क तोंडाने पेढा भरवून शुभेच्छा दिल्याची मोठी चर्चा झाली होती. तोंडाने पेढा भरवितानाचा त्यांचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला होता. ते असंख्य कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला आवर्जून हजेरी लावून आपल्या खास शैलीत शुभेच्छा देतात. याशिवाय कार्यकर्त्याने नवीन गाडी घेतल्यानंतर दीडशेच्या स्पीडने त्या वाहनाची ते राईड करतात. उदयनराजेंच्या स्टाईलवर सातारा जिल्ह्यातील तरूणाई फिदा असते.
वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम :खासदार उदयनराजे भोसले यांचा शुक्रवारी (दि. 24) वाढदिवस आहे. त्यानिमित्त गेल्या तीन दिवसांपासून सातार्यासह जिल्ह्यात बैलगाडी शर्यत, शरीर सौष्ठव स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबीर, बास्केट बॉल स्पर्धा, फॅशन शो, सिंगिंग लाईव्ह कॉन्सर्ट, रक्तदान शिबीर, क्रीकेट स्पर्धा, अन्नदान, फळे वाटप, नृत्य स्पर्धा, शालेय वस्तू वाटप, डॉग शो, असे विविध कार्यक्रम होत आहेत. सातारा नगरपालिका निवडणूक तोंडावर असल्याने यंदा उदयनराजे समर्थकांनी वाढदिवसानिमित्त जंगी तयारी केली आहे.
हेही वाचा -MLC Seats Row : विधान परिषदेतील बारा आमदारांचा घोळ सुटेना; शिंदे, फडणवीस यांच्यात मतभेद?