सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी मैदानावर 'जल्लोष गाण्यांचा' या रोहित राऊत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये खुद्द उदयनराजेंचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर उदयनराजेंनी 'तेरे बिना जिया जाये ना' हे गाणे गात आपल्या चाहत्यांवरील प्रेम व्यक्त केले. उदयनराजेंनी गाणे गायल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
उदयनराजेंच्या हटके अदा :उदयनराजे आपल्या चाहत्यांसाठी कधी कॉलर उडवतात, तर कधी गाणे गातात. ज्या स्पर्धेला भेट द्यायला जातील त्या स्पर्धेच्या मैदानात उतरून त्या खेळातील आपले कौशल्य दाखवून प्रेक्षकांना खूष करतात. उदयनराजे नेहमीच विविध माध्यमांतून आपल्या चाहत्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतात. आपल्या वाढदिवसानिमित्त 'तेरे बिना जिया जाये ना' हे गाणे गात सातारकरांवरील प्रेम व्यक्त केले.
तुमच्यासाठी गाणे गायले :साताऱ्यातील गांधी मैदानावर उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाहत्यांनी केलेल्या मागणीवरून त्यांनी हिंदी चित्रपटातील गाणे गायले. तुम्ही माझ्यावर प्रेम करता. म्हणून तुमच्यासाठी हे गाणे गायल्याचे उदयनराजेंनी सांगितले.