सातारा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्याच्या एमआयडीसीत खंडणीखोरीमुळे उद्योग आले नाहीत, असा अप्रत्यक्षपणे निशाणा खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंवर साधला होता. त्याला आता उदयनराजे भोसलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. मंत्री, संत्री कोण काय बोलले मला माहित नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात हिंमत असेल तर तुमची चौकशी करायला ईडीला सांगा, असे आव्हान उदयनराजे भोसलेंनी अजित पवारांचा नामोल्लेख टाळून दिलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले की, आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात हिंमत असेल तर तुमची चौकशी ईडीला करायला सांगा. दोन लाखांची खंडणी घेतल्याचा फालतू आरोप करू नका. एखाद्याने चांगले काम करायचेच नाही का?. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की लुटारू आहात, हे एकदा ठरवा. सत्ता आज आहे आणि उद्या नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे काम आहे. ही लोक पदावरून जातात त्यावेळी कार्यालयातील स्टाफही त्यांना ओळख देत नाही. पण, आपले तसे नाही, आपली 'स्टाईल इज स्टाईल', असे सांगताना त्यांनी कॉलर उडवली.