सातारा- खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या सोना अलॉईज या कंपनीचे राजकुमार जैन यांना मारहाण करण्यात आली होती. त्याचबरोबर जैन यांना २४ लाखांची खंडणी देखील मागण्यात आली होती. या प्रकरणी साताऱ्याचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह तब्बल १२ जणांची जिल्हा सत्र न्यायालयाने मुक्तता केली आहे. सबळ पुराव्यां अभावी न्यायालयाने वरील सर्वांना निर्दोष मुक्त केले आहे.
जवळपास तीन वर्षानंतर लागलेल्या या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर बोलवून आपणास बेदम मारहाण करत २४ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार जैन यांनी २३ मार्च २०१७ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार माजी खासदार उदयनराजे यांच्यासह १२ जणांवर मारहाण करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर उदयनराजे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा तसेच उच्च न्यायालयात अर्ज केले होते. मात्र, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी उदयनराजे यांनी स्वत: अटक करून घेतली होती.