सातारा: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. त्यांनी थेट भेट घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी अर्धा तास चर्चा केली.
मराठा आरक्षण मुद्द्यावर श्वेतपत्रिका काढा; उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबधी जे काही निर्णय घेतले आहेत. ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन खटल्यात सरकारकडून वकिलांना नेमके काय निर्देश दिले गेले आहेत याचा खुलासा होईल.
मुख्यमंत्र्यांसमोर ५ प्रमुख प्रश्न
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ५ प्रमुख प्रश्न उपस्थित केल्याचे सांगण्यात येते. एसईबीसी उमेदवाराने ईडबल्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारलं तर सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार आहे का? मोठ्या प्रमाणावर ईडबल्यूएस आरक्षण स्वीकारलं तर त्याचा या केसवर काही परिणाम होणार आहे का?
ईडबल्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवले तर त्याचा मराठा समाजातील उमेदवारांवर काही परिणाम होईल का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
MPSC च्या निवडपात्रांना सामावून घ्या
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबधी जे काही निर्णय घेतले आहेत ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन खटल्यात सरकारकडून वकिलांना नेमके काय निर्देश दिले गेले याचा खुलासा होईल. MPSC च्या माध्यमातून निवड झालेल्या २१५० उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत सामावून का घेत नाही? या प्रश्नांवर उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली .
तर साष्टांग नमस्कार घालीन
दरम्यान, मराठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी मध्यंतरी केले होते. राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या दिशेने होता. गेल्याच आठवड्यात उदयनराजेंनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती.