सातारा -सत्ता विकेंद्रीकरणाचा महात्मा गांधींचा विचार काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगितला. मात्र, विकेंद्रीकरणाऐवजी त्यांनी सत्तेचं केंद्रीकरण केलं. वर्षानुवर्षे लोकांचा आपल्या सोयीप्रमाणे राजकारणासाठी वापर केला. पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्रीपदावर असताना राज्य सहकारी शिखर बँकेवर प्रशासक नेमला. बँकेत मोठा भ्रष्टाचार असल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्री असताना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू न शकलेले पृथ्वीराज चव्हाण आज भ्रष्ट लोकांच्या संगतीत राहून मतांचा जोगवा मागत आहेत, अशा शब्दांत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा समाचार घेतला.
कराड तालुक्यातील विंग गावात झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे उपस्थित होत्या.