सातारा- कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी शुक्रवारी सकाळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. उदयसिंहांनी राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडवत खिलाडूवृत्तीचाही कराडकरांना प्रत्यय आणून दिला. चव्हाणांना शुभेच्छा देतानाचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा झाली.
उदयसिंह उंडाळकरांनी पृथ्वीराज चव्हाणांचे केले अभिनंदन
कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकार मंत्री विलास उंडाळकर हे दोघेही काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून राज्याला परिचित आहेत. तसेच त्यांच्यातील राजकीय वैरही महाराष्ट्राला माहित आहे. गेल्या 40 वर्षे चव्हाण-उंडाळकर यांच्यातील वाद महाराष्ट्र पाहत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आजपर्यंत हा वाद मिटविता आलेला नाही. आदर्श प्रकरणानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर 2010 मध्ये काँग्रेस नेतृत्वाने पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून धाडले. त्यानंतर 2014 ची विधानसभा निवडणूक काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविली. त्यावेळी कराड दक्षिणमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास उंडाळकर यांनी बंडखोरी केली होती. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले आणि विलास हे अपक्ष म्हणून लढले होते. त्यावेळी खरी लढत चव्हाण-उंडाळकर अशीच झाली होती. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत तसेच चित्र होते. फक्त विलास उंडाळकरांऐवजी यावेळी त्यांचे पूत्र अॅड. उदयसिंह पाटील हे रिंगणात होते.
मात्र, पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांच्यात लढत झाली आणि उदयसिंह उंडाळकर तिसर्या क्रमांकावर राहिले. विधानसभेची पहिलीच निवडणूक लढलेल्या उदयसिंहांचा पराभव झाला. तरीही त्यांनी दुसर्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी कायम बेरजेचे राजकारण केले. त्यांच्या विचारधारेशी नाळ कायम ठेवत विलास उंडाळकर कार्यरत आहेत. चव्हाण-उंडाळकर यांच्यात राजकीय वैर असले तरी भाजपचे उमेदवार अतुल भोसले हाच दोघांचाही मुख्य विरोधक होता. भाजपसारख्या पक्षाचा कराड दक्षिणमध्ये शिरकाव होऊ नये, हाच दोघांचाही प्रयत्न होता आणि यापुढेही राहणार आहे.