दुष्काळी जनतेचे अश्रू पुसण्यासाठी धावले दोन माजी सनदी अधिकारी - satara lockdown
कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू झाल्यापासून दुष्काळी भागातील गरीब जनतेची ससेहोलपट सुरू आहे. कशीबशी गुजराण करत असलेल्या आपल्या दुष्काळी भावंडांचे अश्रू पुसण्यासाठी माणमधील दोन सेवानिवृत्त आयएएस (माजी सनदी अधिकारी) धावून आले आहेत.
सातारा - कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू झाल्यापासून दुष्काळी भागातील गरीब जनतेची ससेहोलपट सुरू आहे. कशीबशी गुजराण करत असलेल्या आपल्या दुष्काळी भावंडांचे अश्रू पुसण्यासाठी माणमधील दोन सेवानिवृत्त आयएएस (माजी सनदी अधिकारी) धावून आले आहेत.
माण-खटाव या दुष्काळी तालुक्याला मागील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाने तर परतीच्या पावसावेळी अतिवृष्टीने मारले. यातून कसाबसा तरून निघालेल्या माणदेशी माणसांनी पुन्हा नव्या जोमाने अविरत कष्ट घेवून शेती पिकवली. आता जोमात आलेल्या पिकाचे चांगले पैसे मिळणार या आशेवर असतानाच कोरोनाचं सावट गडद झालं. अन् हातातोंडाशी आलेली पिके मातीमोल झाली. शेतकर्यांसोबतच शेतमजूर, मेंढपाळ, मजूर यांच्यावर संचारबंदीमुळे मोठे संकट ओढवले. त्यांना दोन वेळेची भाकरी मिळवणं अवघड झालं. हाताला काम नसल्यामुळे साठवलेलं किडूकमिडूक सुध्दा संपत आलं. दु:खाचे कडू घोट पचवत दोन घास पोटात ढकलण्याचा प्रयत्न या गरीब गरजूंचा सुरू होता.
ही बिकट परिस्थिती माजी आयुक्त प्रभाकर देशमुख व माजी आयुक्त तानाजी सत्रे या माणच्या दोन सुपुत्रांच्या कानावर घालण्यात आली. त्यांनी तत्काळ गरीब गरजू माणदेशी जनतेसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. तानाजी सत्रे व प्रभाकर देशमुख यांनी स्वतः तसेच ड्रीम सोशल फाऊंडेशन, समता पुरुषोत्तम अगरवाल मेमोरियल फाऊंडेशन व इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून माण खटाव मतदारसंघातील गरजू पाच हजार पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
माण-खटावमधील गावागावामध्ये गरजू व्यक्ती व कुटुंबापर्यंत ही मदत प्रभाकर देशमुख युवा मंचच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे. अतिशय बिकट परिस्थितीत ही मदत मिळाल्यामुळे अत्यंत हालाखीची परिस्थिती असणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.