सातारा - लॉकडाऊनमध्ये मुंबईहून साताऱ्यात प्रवास करणाऱ्या 18 वर्षीय युवकावर सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. आता हा युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यासोबतच कराड येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात व्यक्तीचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबद्दलची माहिती दिली.
साताऱ्याजवळील कोडोली भागात राहणारा 18 वर्षीय युवक 27 एप्रिलला विनापरवाना मुंबईहून आला होता. साताऱ्यात प्रवेश करत असताना पोलिसांनी त्याला रोखले. विनापरवाना आल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तिथूनच त्याला सातारा तालुक्यातील खावली येथे संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. आता तपासणीदरम्यान या तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 114 वर पोहोचली आहे. यापैकी 98 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.