महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडातील 'त्या' हाणामारीप्रकरणी मुलींच्या दोन गटांकडून परस्परविरोधी तक्रार - karad

एसटीबसमध्ये बसण्याच्या कारणावरून कॉलेज युवतींच्या दोन गटात दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याच कारणावरून मंगळवारी सायंकाळी मुलींचे दोन गट एकमेकांना भिडले. एकमेकांना शिवीगाळ करत युवतींमध्ये जुंपली.

satara
हाणामारीचे दृश्य

By

Published : Dec 26, 2019, 2:42 AM IST

सातारा- कराडचे शैक्षणिक केंद्र असलेल्या विद्यानगरमधील एका कॉलेजसमोर एसटीत बसण्याच्या कारणावरून मुलींच्या दोन गटात मंगळवारी सायंकाळी फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. याप्रकरणी मुलींच्या दोन्ही गटांनी बुधवारी कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दिली. त्यावरून पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच पोलिसांनी मुलींना आणि त्यांच्या पालकांना समज देऊन पुन्हा असा प्रकार घडता कामा नये, अशी तंबी दिली.

हाणामारीचे दृश्य

एसटीबसमध्ये बसण्याच्या कारणावरून कॉलेज युवतींच्या दोन गटात दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याच कारणावरून मंगळवारी सायंकाळी मुलींचे दोन गट एकमेकांना भिडले. एकमेकांना शिवीगाळ करत युवतींमध्ये जुंपली. त्यांच्यात फ्री स्टाईल हाणामारीही झाली. हाणामारी करणार्‍या काही युवतींच्या हातात हॉकी स्टीक, काठी होती. त्यामुळे घटनास्थळी जमलेले लोकही अचंबित झाले. कराड शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी काही युवतींना ताब्यात घेऊन कराड शहर पोलीस ठाण्यात नेले. रात्री उशिरा दुसर्‍या गटातील मुलींना व त्यांच्या पालकांना शहर पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. त्यावेळी दोन्ही गटातील मुलींनी परस्परविरोधी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला. तसेच मुलींना आणि त्यांच्या पालकांना समज देऊन पुन्हा असा प्रकार घडता कामा नये, असेही बजावले.

दरम्यान, मुलींच्या दोन गटात झालेल्या हाणामारीचे चित्रीकरण दिवसभर कराडमधील अनेकांच्या वॉट्सअॅप ग्रुपवर फिरत होते. हे फक्त एम. एच. 50 येथेच होऊ शकते, असे शिर्षक देऊन मुलींच्या हाणामारीचा व्हीडीओ सर्वत्र व्हायरल करण्यात आला. त्यामुळे कॉलेज युवतींमधील फ्री-स्टाईल हाणामारी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

हेही वाचा-कायदा लागू करणार नाही, असे म्हणणे संविधान आणि संसदेचा अपमान -माधव भांडारी

ABOUT THE AUTHOR

...view details