कराड (सातारा) - सातारा पोलीस अधीक्षकांनी ( Police Superintendent of Satara ) नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दोन टोळ्यांना एक वर्षासाठी हद्दपार करत गुन्हेगारांना दणका दिला आहे. उंब्रज आणि लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांची नोंद असणार्या दोन टोळ्यातील सहा जणांना संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील सात तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक बन्सल यांच्या कार्यकाळात हद्दपार करण्यात आलेल्या गुंडांची संख्या 98 वर पोहोचली आहे..
गंभीर गुन्ह्यांची नोंद -लोणंद पोलीस ठाण्याच्या ( Lonand Police Station ) हद्दीत खून, दुखापत करुन दरोडा, जबरी चोरी, पेट्रोल चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे आणि मालमत्तेसंदर्भातील गंभीर गुन्हे नोंद असणार्या राकेश उर्फ सोन्या भंडलकर आणि सौरभ जगताप यांना सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबत लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी हद्दपार प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर निर्णय देताना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दोन्ही गुन्हेगारांना सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.