सातारा- सांगली जिल्ह्यातील मिरज येथे तरुणाचा खून करून पलायन केलेले दोन संशयीत शुक्रवारी (दि. 3 जाने.) सकाळी कराड पोलिसांच्या तावडीत सापडले. गस्त घालत असताना कराडच्या ईदगाह मैदान परिसरात पोलिसांना एक कार संशयास्पदरित्या आढळून आली. कारमधील तरुणांवर संशय आल्याने त्यांना कराड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कारची तपासणी केल्यानंतर पोलिसांना कोयता आणि चाकू सापडला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या भांडणातून तरुणाचा खून केल्याची कबुली दिली.
एजाज आब्बास शेख (वय 21 वर्षे, रा. अमननगर, उर्दू शाळेजवळ, मिरज) व सोहेल राजू नदाफ (वय 19 वर्षे, रा. कृष्णा घाट रोड, लक्ष्मी मंदिराजवळ मिरज), अशी संशयितांची नावे आहेत. पूर्वी झालेल्या भांडणावरून गुरूवारी (दि. 2 जाने) रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान सलीम बशीर भिलवडे (वय 30 वर्षे, रा. मिरज, जि. सांगली) याचा धारदार शस्त्राने खून केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानुसार कराड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.