सातारा - म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) संसर्ग असलेले रुग्ण सध्या जिल्ह्यामध्ये आढळत आहेत. या संसर्गावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाबरोबरच कराड येथील सह्यादी रुग्णालय व कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय या रुग्णालयांमध्येही उपचार केले जाणार असल्याची माहिती शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. या आजारासाठी नोडल अधिकारी म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक देवीदास बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काय आहे म्युकरमायकोसिस
म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) हा एक दुर्मिळ बुरशीजन्य आजार आहे. कोरोनाकाळात या आजाराचे रुग्ण अचानक वाढल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. हा रोग प्रामुख्याने वैद्यकीय समस्या असणाऱ्या लोकांना प्रभावित करतो. त्यामुळे त्यांची रोगाविरुद्ध लढ्याची क्षमता कमी होते.
कशामुळे होतो म्युकरमायकोसिस
म्युकर नावची बुरशी जमिनीत, खतांमध्ये सडणाऱ्या फळांत व भाज्यांत, तसेच हवेत आणि अगदी निरोगी व्यक्तींच्या नाकात आणि नाकाच्या स्त्रावातही आढळते. ज्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी होते, जसे कर्करोगाचे रुग्ण, एचआयव्ही बाधा असलेले रुग्ण, ज्यांचे अवयव प्रत्यारोपण झाले आहे अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असू शकते.