महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 14, 2020, 11:57 AM IST

ETV Bharat / state

कुत्रा चावलेल्या रुग्णाला रेबीजच्या लसीऐवजी दिले वेदनाशामक इंजेक्शन

कराड तालुक्यातील वसंतगड या गावातील सुहास गायकवाड यांना श्वानाने चावा घेतला होता. म्हणून रेबीजची लस घेण्यासाठी ते नजीकच्याच सुपने गावातील आरोग्य केंद्रात गेले. तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. रुग्णालयातील आरोग्य सेविकांनी रेबिजची लस देण्यास टाळाटाळ केली.

satara
रेबीजच्या लसीऐवजी दिले वेदनाशामक इंजेक्शन

सातारा- भटके कुत्रे चावलेल्या रुग्णाला रेबीज लस देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर रुग्णाने आपल्या मोबाईलवरून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकार्‍याशी संपर्क साधला. त्या अधिकारी आपल्या आरोग्य सेविकेशी बोलल्या आणि काही वेळातच रुग्णाला इंजेक्शन दिले. परंतु, रेबीजऐवजी वेदनाशामक इंजेक्शन दिल्याची बाब मोबाईलमधील रेकॉर्डींग ऐकून रुग्णाला समजली. त्यामुळे रुग्णाने थेट आरोग्य मंत्र्यांपर्यंत तक्रार करून आरोग्य खात्याचे वाभाडे काढले. ही घटना कराड तालुक्यातील वसंगतगड येथे घडली आहे.

सरकारी खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी गलेलठ्ठ पगार घेतात. परंतु, ते प्रामाणिकपणे लोकसेवा करतात का, असा प्रश्न सतत निर्माण होतो. सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांचा असाच एक कारनामा रुग्णामुळे उजेडात आला आहे. कराड तालुक्यातील वसंतगड या गावातील सुहास गायकवाड यांना श्वानाने चावा घेतला होता. म्हणून रेबीजची लस घेण्यासाठी ते नजीकच्याच सुपने गावातील आरोग्य केंद्रात गेले. तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. रुग्णालयातील आरोग्य सेविकांनी रेबिजची लस देण्यास टाळाटाळ केली. म्हणून सुहास गायकवाड यांनी वैद्यकीय अधिकारी शुभलक्ष्मी देशपांडे यांच्याशी स्वतःच्या मोबाईलवरून संपर्क साधला. देशपांडे यांनी रुग्णाला वेदनाशामक इंजेक्शन द्यायला आरोग्य सेविकेला सांगितले. तसेच ही गोष्ट रुग्णाला सांगू नकोस, असेही त्या म्हणाल्या. इंजेक्शन घेतल्यानंतर रुग्ण सुहास गायकवाड हे निश्चिंत होऊन घरी गेले. परंतु, दुसर्‍या दिवशी त्यांनी आपल्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डींग ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसला. रेबीजची लस म्हणून आपणास केवळ वेदनाशामक इंजेक्शन दिल्याचे लक्षात आल्यामुळे रुग्णाचा संताप अनावर झाला.

या प्रकाराची त्यांनी थेट कराड पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार केली. तसेच आरोग्य मंत्रालयाकडेही तक्रार दाखल केली. शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन सरकारी खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या जीवाशी कसे खेळतात, याचे उदाहरणच या घटनेमुळे समोर आले. सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करावी. तसेच त्यांची बदली करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details