सातारा - 'कोरोना' विषाणूच्या भीतीमुळे महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे महाबळेश्वर व पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणची पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. उन्हाळ्याची चाहुल लागताच या दोन्ही थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, यावेळेस कोरोनामुळे ही संख्या रोडावली आहे.
कोरोना विषाणूने महानगरांमध्ये शिरकाव केला आहे. जिल्ह्याची वेस असलेल्या पुण्यापर्यंत हा संसर्ग येऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पुरेशी सतर्कता बाळगली जात असली तरी महानगरांमधील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. जानेवारी संपताच वाढत्या तापमानामुळे पर्यटकांना महाबळेश्वर-पाचगणीची ओढ लागते. विशेषत: 'विकेंड'ला सातारा जिल्ह्यातील ही दोन्ही थंड हवेची ठिकाणे गर्दीने फुलून जातात. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोनामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात १६ रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यात्रा-जत्रा, मॉल, जलतरण तलाव आदी गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने पायबंद घातल्याने जिल्ह्यातील पर्यटनावर परिणाम जाणवू लागला आहे.